
मुंबई प्रतिनिधी – तुम्ही अनेकदा रिक्षावाल्यांच्या मुजोरीबद्दल बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. भाडे नाकारण्यापासून जास्तीचं भाडं आकारल्याने तुमचीही कधीतरी रिक्षावाल्यांसोबत तू-तू मै-मै झाली असेल. असाच एक धक्का प्रकार वाशी रेल्वे स्थानकाजवळ (Vashi railway station) घडला आहे. मात्र, हा प्रकार काही सामान्य माणसासोबत नाही तर एका पोलिसासोबत घडला आहे. रिक्षाचालकाने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची झाल्याने रागाच्या भरामध्ये रिक्षाचालकाने थेट पोलिसाच्या कानाखाली दिली. कायद्याच्या रक्षकांसोबतच जर अशा घटना घडत असतील तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वाशी रेल्वे स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याला एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी वाशी येथील मनपा रुग्णालयात घेऊन जायचे होते. त्यासाठी त्यांनी स्टेशनजवळ असलेल्या एका रिक्षाचालकाला विचारणार केली. मात्र, त्याने भाडे नाकारल्याने पोलीस आणि रिक्षाचालकांमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान राग अनावर झाल्याने रिक्षाचालकाने पोलिसाच्या कानाखाली दिली तसेच रिक्षाचालकांच्या साथीदाराकडून पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर वाशी पोलीस स्टेशनला कलम 353, 332, 323, 504, 506 लावून रिक्षाचालकावर आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या दोन्ही आरोपींना अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी दिली.