
स्वतःला अध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या पापाचा घडा आता भरत चालला असून, त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

एका कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 85 लाख रुपयांना गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कांदा व्यापाऱ्याची 60 लाख रुपये किमतीची जागा वृद्धाश्रमाच्या नावे केवळ 22 लाख 25 हजार रुपयांच्या अल्प दरात खरेदी करून खरातने व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, या बदल्यात दुसऱ्या एका चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचे आणि प्लॉट विक्रीच्या व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. या आमिषाला बळी पडून संबंधित व्यापाऱ्याने खरातला वेळोवेळी एकूण 85 लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेऊनही खरातने ना जागा दिली, ना गुंतवलेले पैसे परत केले.

जेव्हा व्यापाऱ्याने आपल्या हक्काच्या पैशांसाठी आणि जागेसाठी खरातकडे तगादा लावला, तेव्हा या भोंदूने आपला खरा चेहरा दाखवला. “पैसे आणि जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल,” असा शाप देत त्याने व्यापाऱ्याला मानसिक दडपणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. आता व्यापाऱ्याने पोलिसांत धाव घेत अशोक खरात विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे असून 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. आध्यात्मिकतेच्या नावाखाली महिलांचे शोषण आणि भोळ्या नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या अडचणीत आता वाढ होताना दिसून येत आहे. सरकारवाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, खरातच्या जाळ्यात अजून किती जण अडकले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

