Latest Marathi News
Ganesh J GIF

वृद्ध महिलेची 2 कोटींची फसवणूक ; 6 जणांवर FIR

वृद्ध महिलेच्या वृधत्वाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेऊन सहा जाणांनी धायरी येथील जागा कमी किमतीत विकून दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली. तसेच दोघांनी महिलेकडे 10 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2022 ते मार्च 2024 या कालावधीत गुलटेकडी येथे घडला आहे.

याबाबत तारामती सदानंद पाठक (वय-75 रा. सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी मंगळवारी (दि.18) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रवी सुरेश जाधव (रा. लेन नं. 5, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे , चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरुणराज संजीव कुसाळकर , करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध), अभिजीत (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 406, 420, 385, 386, 387, 506, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची धायरी येथे 1 हेक्टर 33.6 आर एवढ्या आकाराची जमीन आहे. आरोपी रवी जाधव याने इतर आरोपींसोबत संगनमत करुन फिर्यादी यांच्या वृद्धत्वाचा व आजारपणाचा गैरफायदा घेऊन विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची धायरी येथील जमिनीच्या किमतीची खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. रेडी रेकनरच्या दरानुसार ही जमीन तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची असताना आरोपींनी केवळ एक कोटी रुपयांना विकण्यास भाग पाडले. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच रवी जाधव आणि अभिजीत या दोघांनी 23 नोव्हेंबर 2023 रोजी महिलेच्या घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. फिर्यादी दोघांना भेटण्यासाठी आले असता त्यांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!