
पुणे विशेष प्रतिनिधी – पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाच्या दोन अभियंते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 2500 रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींचे नाव किरण अरुण शेटे (वय – ३१, पद- उप अभियंता यांत्रिकी वर्ग -१) आणि परमेश्वर बाबा हेळकर, (वय -४९ पद- शाखा अभियंता वर्ग -२), असे आहे. लाचलुचपत विभागाने बुधवारी 6 जुलैला सापळा रचून कारवाई करत या लाचखोर अभियंत्यांना रंगेहात पकडले. यातील तक्रारदार लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी शिवेगाव ता. खेड येथील अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरीफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी देण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केली होती. तर आरोपी लोकसेवक शेटे व हेळकर यांनी तक्रारदाराकडे अंदाजपत्रकाच्या 2% रकमेची लाचेची मागणी केली.

यानंतर तक्रारदार विभागाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानंतर आरोपी लोकसेवक हेळकर याने 2500 रुपये स्विकारले. यावेळी त्याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोकॉ भूषण ठाकूर, पोकॉ दिनेश माने, मपोकॉ पूजा पागिरे, चालक पोकॉ चंद्रकांत कदम यांच्या पथकाने केली.


