पुणे – पुण्यातील तीन मुली तर बिबवेवाडीतील शिवतेजनगरमधून भर दुपारी बेपत्ता झाल्या. हे समजल्यावर शहर पोलीस दल धास्तावले. सर्व कामाला लागले. त्यानंतर या मुली कल्याणमधील अंबिवली येथे असल्याचे समजले. स्थानिक पोलिसांना कळविल्याने त्यांनी या मुलींना ताब्यात घेतल्याचे समजल्यावर पोलिसांनी नि:श्वास सोडला.
याबाबतची माहिती अशी, अपर बिबवेवाडीमधील शिवतेजनगर येथील १२ वर्षे, १५ वर्षे आणि १५ वर्षे वयाच्या शेजारी शेजारी राहणार्या अल्पवयीन मुली २ सप्टेबर रोजी दुपारी दीड वाजता किराणा दुकानात घरगुती सामान घेत होत्या. त्यानंतर त्या व्हि आय टी कॉलेजकडे जाणार्या रोडने गेल्या़ त्यानंतर त्या कोणाला दिसल्या नाहीत. त्यांच्या नातेवाईकांनी ठिकठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांचा शोध न लागल्याने त्यांच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. एकाचवेळी तीन मुली बेपत्ता झाल्याचे समजल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. संपूर्ण परिमंडळ, पुणे शहर पोलीस दल कामाला लागले. मुलींचे फोटो सर्वत्र पाठविण्यात आले. त्यांच्या मित्र मैत्रिणीकडे चौकशी केली गेली. परंतु, रात्र उलटून दुसरा दिवस सुरु झाला तरी या मुलींचा काही तपास लावला नव्हता. मुलींचा तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने शोध घेत असताना या मुली ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील अंबिवली येथे असल्याची माहिती मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना याची माहिती दिली. त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधून खडकपाडा पोलिसांना माहिती दिली. मुलींचे वर्णन व फोटो पाठवून माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार खडकपाडा पोलिसांनी अंबिवली येथून ताब्यात घेतले. त्यांना बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सुखरुप आणण्यात आले. फिरत फिरत गेल्याचे या मुलींनी सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा , सहायक पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार विशाल जाधव, प्रतिक करंजे, वर्षा ठोंबरे यांनी केली आहे.