
एकनाथ शिंदेंचा पीए असल्याचे सांगत ५५ लाखाचा गंडा
दांपत्याने २० जणांना घातला गंड, बनावट लेटर पॅड, लेटर आणि बरेच काही, शिंदेंच्या नावे फसवणुकीचे रॅकेट
जळगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा गैरवापर करून एका दाम्पत्याने शहरातील काही नागरिकांची सुमारे ५५ लाख ६० हजार रुपयात फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.
पाचोरा शहरातील मूळ रहिवाशी असलेले हितेश रमेश संघवी आणि त्यांची पत्नी अर्पिता संघवी या दाम्पत्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवले. या दाम्पत्याने रेल्वे मध्ये नोकरी लावू देऊ, म्हाडामध्ये प्लॅट देऊ यासह इतर अनेक आमिष दाखवून नोव्हेंबर २०२४ ते ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अनेकांची फसवणूक केली. हर्षल बारी यांचा दूध डेअरीचा व्यवसाय असून कालिंका माता मंदिर परिसरात असलेल्या त्यांच्या डेअरीमध्ये हा सर्व प्रकार घडला. या दोघांनी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे ओळखपत्र, लेटर पॅड व अपॉइंटमेंट लेटर दाखवून जळगावमधील हर्षल बारी या तरुणासह १८ जणांची फसवणूक केली. त्यांनी बारीकडून १३ लाख ३८ हजार रुपये व इतर उर्वरित जणांकडून एकूण ४२ लाख २२ हजार रुपये अशी एकूण ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे तसेच जळगावचे आमदार गुलाबराव पाटील हे माझ्या खूप जवळचे असल्याची बतावणी करून फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे. ही घटना शहरात मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून, सरकारी पदाचा खोटा आव आणून लोकांना फसवणाऱ्या टोळीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आली आहे. पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दांपत्याविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.