
मैत्रीत झालेल्या गैरसमजातून दोन जणांनी एका 15 वर्षाच्या शाळकरी मुलावर कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना पुण्यातील मणेरवाडी, घेरा सिंहगड परिसरातील आनंदवन सोसायटी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रकाश हरीसिंग राजपूत असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकतो. त्याची आई सोसायटीच्या परिसरात कामगार आहे. येथील कामगारांच्या खोलीत तो आई आणि भावासमवेत राहत होता. दररोज दुपारी शाळेतून आल्यानंतर तो जेवून झोपत असे. सोमवारी शाळा सुटल्यावर तो घरी येऊन जेवण करुन झोपला. झोपेत असतानाच हल्लेखोरांनी (2 अल्पवयीन) त्याच्या डोक्यात कोयते, धारधार शस्त्राने वार केले. जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळत सुटला. मात्र, शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेनदनासाठी रुग्णालयात पाठवला.
प्रकाश आणि हल्लेखोर यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती. प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.