‘स्वबळावर सत्ता मिळवून शिवसेनेचे ओझे उतरवण्याचा भाजपचा हिशोब होता’
शरद पवारांच्या पुस्तकात मोठा गाैप्यस्फोट, 'लोक माझे सांगाती' पुस्तकाने राजकारणात खळबळ
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग २ मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे.
राज्यात २५ वर्ष एकत्रित असलेल्या शिवसेना भाजप कसे वेगळे झाले आणि त्याचा काँग्रेस राष्ट्रवादीला कसा फायदा झाला याचा खुलासा केला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कोणताही स्नेहभाव नाही, शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच राजकीय हिशोब भाजपचा होता. असा मोठा गाैप्यस्फोट शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. ते म्हणाले शिवसेनेला संपवल्याशिवाय भाजप वाढणार नाही. हाच हिशोब होता. स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचं ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती. विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना १७१ आणि भाजप ११७ जागा लढत असे. पण २०१९ नंतर चित्रं बदललं. शिवसेनेने १२४ जागा लढल्या. तर भाजपने १६४ जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. असा खुलासा पुस्तकात करण्यात आला आहे. भाजप आपल्या अस्तित्वावर उठला आहे असा तीव्र संताप शिवसेनेत होता. परंतु सत्तेत एकत्र असल्यामुळे त्याचा उद्रेक झाला नाही. मात्र यावरून आग धुमसत होती असा दावा शरद पवारांनी केला आहे. तसेच भाजप- शिवसेना यांच्यातील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते, असेही पवारांनी म्हटले आहे. दरम्यान लोक माझे सांगतीच्या पहिल्या भागाचे प्रकाशन हे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत झाले होते.
लोक माझे सांगातीचा भाग दोन हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित होणार आहे. राज्यात २०१४ नंतर अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. या २०१४ ते २०२३ पर्यंतचा काळाबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक धक्कादायक खुलासे होणार? अशी चर्चाही रंगली आहे. विशेषतः विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राज्यात अस्तित्वात आलेली महाविकास आघाडीबाबत अनेक गोष्टी प्रथमच उजेडात येण्याची शक्यता आहे.