पुण्यामध्ये आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा व विराट जनसभा
आम आदमी पक्षाचे मिशन महाराष्ट्र, स्वराज्य यात्रा उद्या पुण्यात, लोकसभेचे बिगुल फुंकणार
पुणे दि ३१(प्रतिनिधी)- दिनांक २ जून रोजी आम आदमी पार्टीचे स्वराज्य यात्रा पुण्यामध्ये दाखल होत असून आझम कॅम्पस पुना कॉलेज येथून रॅलीची सुरुवात होणार आहे तर सणस ग्राउंड शेजारी जाहीर सभा होणार आहे. आज आम आदमी पार्टी तर्फे पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्रामध्ये स्वराज्य यात्रेची सुरुवात २८ मे रोजी भक्ती स्थळ पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जून राज्याभिषेक दिनी शक्तिस्थळ रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा ही ८ जिल्ह्यात सुमारे ८०० किलोमीटर अंतर पार करत गावागावातून, खेड्यातून, वाड्या वस्त्यावरून जात नागरिकांचे लक्ष वेधत आहे. दिल्ली व पंजाब मधील सरकारने केलेल्या मोफत शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, महिलांना मोफत बस प्रवास अशा असंख्य कामाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहे. यासाठी नागरिकांनी यात्रेमध्ये मोठा सहभाग नोंदविला व जनसभेमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली. पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये १३ टक्के मतदान मिळवत आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनामुळे संपूर्ण आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी करिष्मा करेल असे अंदाज पुणेकर नागरिक यानिमित्ताने बांधत आहेत.
या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे, एकनाथ ढोले, किशोर मुजुमदार, गणेश ढमाले, आनंद अंकुश, सचिव सुजित अग्रवाल, मीडिया प्रमुख अमित म्हस्के, प्रवक्ता धनंजय बेनकर उपस्थित होते.