विनायक मेटेंच्या घातपातामागे ड्रायव्हर कदमचा हात?
मेटेंचे भाचे बाळासाहेब चव्हाणांचा धक्कादायक खुलासा
बीड दि १७ (प्रतिनिधी)- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत काल एक आॅडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज त्यांच्या भाच्याने पत्रकार परिषद घेत गंभीर खुलासे केले आहेत.त्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढला आहे.
विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम याच्यावर संशय व्यक्त केला आहे चव्हाण म्हणाले की, ज्या दिवशी साहेबांच्या गाडीला अपघात झाला त्या दिवशी पहाटे मला साहेबांचे पीए विनोद काकडे यांचा फोन आला होता, बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बोगद्याजवळ जा. मी त्यावेळी विचारलं ड्रायव्हर कोण आहे. त्या दिवशी एकनाथ कदम नावाचा ड्रायव्हर होता. मी कदमला फोन केल्यावर विचारल की तू कुठे आहे, तर तो रडत होता. मी लोकेशन विचारलं तर तो सांगत नव्हता. नंतर त्याने मला तुम्ही कोणअसं विचारलं. गेल्या १२ वर्षांपासून तो काम करतो, मलाही तो ओळखतो. मी दुसऱ्या फोनवरून जरी फोन केला तरी तो आवाज ओळखत होता. पण, तो अचानक मला तुम्ही कोण आहे, असं विचारत होता. तो सारखा रडत होता.त्यामुळे तिथला एकजण माझ्याशी बोलला तो म्हणाला की ड्रायव्हरला काहीही झालं नाही, अंगरक्षक बेशुद्ध आहे, तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीत आहात का, मी हो म्हटल्यावर त्याने सांगितलं की, साहेब जागेवर गेले आहे, असं सांगत चालकावर संशय व्यक्त केला आहे.
तसेच अपघाताच्या आधीच्या टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मेटे साहेबांचा चेहरा दिसला नाही. समोर बॉडीगार्ड दिसत होता. चालक कदम हा कुणाला तरी फोनवर बोलत होता, दोन महिन्यात कदम याला कुणाचे फोन आले त्याने कोणाला फोन केले, याची माहिती समोर आली पाहिजे,असे चव्हाण म्हणाले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर कदम आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे.