मिस वर्ल्ड स्पर्धेतील सौंदर्यवतीचे अवघ्या २६ व्या वर्षी निधन
या गंभीर आजाराशी झुंज अपयशी, अल्पावधीत मिळवली होती ओळख, जगभरातून शोक व्यक्त
दिल्ली दि १७(प्रतिनिधी)- मिस वर्ल्ड स्पर्धेतील स्पर्धक शेरिका डी अरमास हिचं वयाच्या २६ व्या वर्षी निधन झाले आहे. तिने २०१५ साली उरुग्वे देशाचे प्रतिनिधित्व केलं होतं. ती बरीच वर्ष कर्करोगाशी झुंज देत होती. पण तिची ही लढाई आता संपली आहे. शेरिकाने मिस वर्ल्ड स्पर्धेत फक्त सहभागी होत अनोखा विक्रम केला होता. आता तिला जगभरातून श्रद्धांजली वागण्यात येत आहे.
शेरिका ही गेल्या काही दिवसांपासून गर्भाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत होती. शेरिकाने केमोथेरपी आणि रेडिओथेरपी उपचार देखील घेतले होते. पण १३ ऑक्टोबर रोजी तिची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली, आणि तिने आपला अखेरचा श्वास घेतला. महत्वाचे म्हणजे २०१५ मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत शेरिका डी अरमास हिची पहिल्या ३० मध्ये देखील निवड झाली नव्हती. पण ती या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या १८ वय असणाऱ्या सहा स्पर्धक मुलींपैकी एक होती. विशेष म्हणजे आपल्या आजाराबद्दल तिला पूर्ण माहिती होती. त्यामुळे शेरिका तिचा बराचसा वेळ हा पेरेझ स्क्रॅमिनी फाऊंडेशनमध्ये देखील घालवत होती. ही संस्था कर्करोगाने पीडित मुलांवर उपचार करते. ती कमी वयात एक उद्योजिका देखील झाली होती. शेरिकाने तिचा मेकअप ब्रँडसुद्धा लाँच केला होता. शे डी अरमास स्टुडिओ या नावाने ती केस आणि पर्सनल केअरशी संबंधित प्रॉडक्ट्स विकायची. तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे त्यात ती म्हणाली होती की, “मला नेहमीच मॉडेल बनायचं होतं. मग ते ब्युटी मॉडेल असो किंवा जाहिरातीसाठी मॉडेल किंवा कॅटवॉक मॉडेल. फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट मला खूप आवडते. ही स्पर्धा खूप आव्हानात्मक आहे, मात्र त्यात सहभागी झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे.” तिचा ध्येयाप्रती असलेली जवळीकतेचे जोरदार काैतुक होत आहे. शॆरिकाच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि जगभरातील विविध क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. मिस उरुग्वे २०२१ ची लोला डे लॉस सँटोस यांनी म्हटले की, मला नेहमी तुझी आठवण येईल, फक्त तू मला दिलेल्या सर्व पाठिंब्यासाठीच नाही तर तुझ्या स्नेहासाठी, तुझा आनंदासाठी. तुझ्यामुळे जोडले गेलेले मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत, अशी भावना त्यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली आहे. ” माझी लहान बहीण नेहमीच उंच उड्डाण करा”; अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन शेरिका डी अरमासचा भाऊ मयक डी अरमासने आपले दुख व्यक्त केले आहे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. यामुळे अनेक महिलांचा मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान शेरिका डी. अरमासचा जन्म १९९७ साली उरुग्वेच्या मोंटेव्हिडेओ येथे झाला. तिने २०१५ मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेत उरुग्वेचे प्रतिनिधित्व केले होते. स्पर्धेत तिने ‘मिस कॉन्फिडन्स’ हा पुरस्कार जिंकला होता.