‘एवढीच मग्रुरी असेल तर इकडे ईडी, इन्कम टॅक्स आहे’
आमदार राजेंद्र राऊत यांचे दिलीप सोपल यांना ओपन चॅलेंज
सोलापूर दि १९ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील राजकारण कायमच व्यक्ती केंद्रित राहिलेले आहे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यात कायमचे काट्याची टक्कर पहायला मिळाली आहे. पण आता भाजपात गेल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी थेट भाजपा स्टाईलमध्ये माजी मंत्री सोपल यांना ईडीची धमकी दिली आहे. त्यामुळे बार्शीतील राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांनी ‘आर्यन शुगर’ कारखाना विकत घेतला आहे. त्यामुळे आर्यन शुगर सध्या बार्शीच्या राजकारणात कळीचा मुद्दा बनला आहे. त्यातूनच ‘आर्यन शुगर्स’शी तुमचा संबंध नाही, तर कोणाचा आहे? वयाचा विचार करून मी मान-सन्मान ठेवत होतो. पण, एवढीच मग्रुरी असेल तर इकडेही ईडी, इन्कम टॅक्स आहे. कोणं कुठं जाऊन बसायला लागले आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यांचेच काही दोस्त जेलमध्ये जाऊन बसले आहेत.असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी सोपल यांना इशारा दिला आहे. तसेच आर्यन शुगरबाबतची तक्रार पुढच्या आठवड्यात मी स्वतः ईडी कार्यालयात देणार आहे. ईडीची चौकशी लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे म्हणत राऊत यांनी सोपल यांना आव्हान दिले आहे. दिलीप सोपल हे आमदार असताना आर्यन शुगरला जिल्हा बँकेकडून कोट्यवधींचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. हा कारखाना सोपल यांचाच असल्याचा दावा विरोधक करत असतात मात्र सोपल यांनी मात्र त्याचा इन्कार केलेला आहे.
माजी मंत्री दिलीप सोपल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, मागच्या निवडणुकीत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जवळ आल्याने बार्शीचे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.