शुभ मंगल सावधान! देशात एका महिन्यात होणार तब्बल ३५ लाख लग्न
एवढ्या लाख कोटींची होणार उलाढाल, गेल्यावर्षीपेक्षा यंदा लग्नाच्या संख्येत वाढ, जाणून घ्या या काळातील लग्नाचे शुभ मुहूर्त
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- आज महाराष्ट्रात आणि देशात तुळशीचे लग्न उत्साहात पार पडत आहे. पण हे होत असताना आजपासून ते १५ डिसेंबरपर्यंत लग्नसराईचा हंगाम असणार आहे. या काळात देशात विक्रमी संख्येत लग्न होणार आहेत. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा बुस्ट मिळण्याचा अंदाज आहे.
२३ नोव्हेंबर २०२३ पासून लग्नाचा सीझन सुरू होणार असून, १५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या लग्नसराईच्या काळात तब्बल ३५ लाख विवाह होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे लग्न आणि त्यासंबंधी गोष्टीसाठी तब्बल ४.२५ लाख कोटींची उलाढाल होणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या विवाह सोहळ्यांतील सुमारे ६ लाख विवाहांमध्ये प्रति लग्न ३ लाख रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे. १० लाख लग्नांमध्ये प्रत्येक लग्नासाठी सुमारे ६ लाख रुपये खर्च केले जातील. १२ लाख लग्नांमध्ये एका लग्नासाठी सुमारे १० लाख रुपये, ६ लाख लग्नांमध्ये सुमारे २५ लाख रुपये खर्च केले जातील. ५० हजार लग्नांमध्ये सुमारे ५० लाख रुपये खर्च केले जातील. प्रति लग्न आणि ५० हजार विवाह असे असतील, ज्यामध्ये १ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केला जाईल, असा अंदाज आहे. या काळात दिल्लीत साडेतीन लाखांहून अधिक लग्ने होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ३२ लाख विवाह झाले आणि ३.७५ लाख कोटी रुपयांचा खर्च झाला होता. पण यावर्षी त्यात मोठी वाढ झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये लग्नाचे मुहूर्त २३, २४, २७, २८, २९ तारखेला आहेत. तर डिसेंबर महिन्यात ३,४,७,८,९ आणि १५ तारखेला लग्नाचे मुहूर्त आहेत. यानंतर थेट जानेवारी महिन्यात लग्नाचे मुहूर्त असणार आहेत. या सिझननंतर जानेवारीपासून ते जुलैपर्यंत लग्नांचा सिझन असेल असं सांगण्यात आले आहे.