मनासारखे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने केला पतीचा खुन
पुण्यातील या भागात घडली धक्कादायक घटना, पत्नीच्या एका ठोश्यात पतीचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटनेने राज्यात खळबळ
पुणे दि २५(प्रतिनिधी)- सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवासाला मनासारखे बर्थ डे गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने पतीची हत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. तसेच याची जोरदार चर्चा देखील होत आहे.
निखिल पुष्पराज खन्ना असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी रेणुका निखिल खन्ना हिला वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना वानवडी येथील गंगा सॅटेलाईट सोसायटी येथे घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल आणि रेणुका या दोघांचा सहा वर्षापूर्वी प्रेम विवाह झाला होता. सप्टेबरमध्ये रेणुकाचा वाढदिवस होता. त्यावेळी आपला वाढदिवस दुबई साजरा करण्याची तिची इच्छा होती. पण पती निखिल यांनी ती इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे या दोघांमध्ये सतत वाद होत होते. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात पत्नी रेणुका हिने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. यामध्ये निखिल हे गंभीर जखमी झाले. त्यामुळे घाबरलेल्या रेणुकाने फोन करून तिचे सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिलला लगेच सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे निखिल यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी रेणुका खन्ना हिला ताब्यात घेतले आहे. तसेच आरोपी रेणूका खन्ना यांनी घटनेवेळी मद्यप्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरु आहे. याबाबत मुलाचे वडील डॉ. पुष्पराज कृष्णलाल खन्ना यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे वानवडी येथील हॅली सोसायटीमध्ये स्पर्श पॉलीक्लिनीक नावाने क्लिनीक आहे.
निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. निखील याचा २०१७ मध्ये रेणुका हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये वारंवार शुल्लक कारणावरून वाद होत होते. तिचे घरातील नोकरांशीही सतत वाद होत असायचे. दरम्यान पुण्यात दोनच दिवसापूर्वी झोपमोड केल्याच्या रागातून एका भाडेकरूने घरमालकाचा खून केला होता.