साक्रीतील दरोडा व अपहरण प्रकरणात नाट्यमय ट्विस्ट
अपहरण झालेली तरुणीच निघाली मास्टरमाईंड, पोलिसही चकीत, प्रियकराच्या साथीने दरोड्याचा कट, असा झाला खुलासा
धुळे दि ३०(प्रतिनिधी)- धुळे जिल्ह्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी एका तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र या प्रकरणात पोलीसांनी सखोल चौकशी केल्यानंतर वेगळीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस देखील चकित झाले आहेत. अपहरण झालेली तरुणीच आरोपी निघाली आहे.
निशा मोठाभाऊ शेवाळे ही या दरोडा आणि अपहरण नाट्याची मुख्य सूत्रधार होती. प्रकरणी आरोपी विनोद भरत नाशिककर व रोहित संजय गवळी यांना मध्य प्रदेशातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार साक्रीत २५ नोव्हेंबरला दरोडेखोरांनी एका घरात दरोडा टाकत ८८ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लुटले होते. तसेच बंगल्यातील ज्योत्स्ना पाटील यांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली होती. हा सगळा प्रकार घडला तेव्हा जोत्सा यांची भाची निशा शेवाळे ही देखील होती. दरोडेखोरांनी हत्यार दाखवत तिला घेऊन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि निशाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. पोलीसांनी निशाच्या शोधासाठी चार पथके स्थापन केली आणि ती संशयितांच्या मिळून येण्याच्या संभाव्य ठिकाणी रवानाही केली होती. पण निशाने स्वतः फोन करत तिच्या वडिलांना ती असलेल्या ठिकाणाची माहिती दिली होती. या नंतर पोलीसांनी तिला सेंधवा मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले. निशा सापडल्याने तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांनाही दिलासा मिळाला होता. पण तिची चाैकशी केल्यानंतर वेगळेच सत्य समोर आले. निशा शेवाळे या तरुणीने आपल्या प्रियकरा सोबतच बनावट दरोड्याचा आणि अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे.पोलिसांनी या प्रकरणी निशा आणि तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी मुख्य संशयितना ताब्यात घेतले असून, हरियाणा राज्यातील चार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी इको कार व बोलेरो अशी दोन वाहने सुध्दा ताब्यात घेतली आहे. तर तरुणीला मध्य प्रदेशच्या सेंधवा येथून ताब्यात घेतले आहे. विनोद भरत नाशिककर हा प्रियकर असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर साक्री आणि परिसरातील नागरिक देखील चकीत झाले आहेत.