संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील खासदारांच्या निलंबनावर राजकीय वर्तुळातून याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहे, या निलंबन यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. अशात सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले,’केवळ सुप्रिया सुळे यांचं एकट्याचंच निलंबन झालं नाही, अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. संसदेत नियमाचा भंग झाल्याने कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते पुढे म्हणाले,’फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही. अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळांत, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिली आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.
तत्पूर्वी, संसदेत आतापर्यंत एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आले असून देशभरात हा मुद्दा चर्चेत आहे. लोकसभेत दोन तरुणांनी घुसखोरी करून स्मोक कँडलचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर त्यावरून विरोधकांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन करण्याची मागणी लावून धरली. यामुळे मोठा गदारोळ झाला. यावर कारवाई म्हणून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून आत्तापर्यंत 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.