
पुणे : अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच मुलीसह तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व बहिणीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान मांजरी बुद्रुक येथे घडला आहे. याबाबत शेवाळवाडी येथे राहणाऱ्या 15 वर्षीय पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन मांजरी बुद्रुक टकले नगर येथे राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलासह त्याच्या आई व बहिणीवर आयपीसी 354(ड), 323, 504 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी व फिर्य़ादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित तरुणी पाणी आणण्याकरीता जात असताना आरोपी पाठीमागून आला. त्याने मुलीला तु मला खुप आवडते, तुझा मोबाईल नंबर दे, तुझा इन्स्टा आयडी दे, मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणाला. मात्र तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिला. आरोपीने मागील पाच दिवसांपासून पीडित तरुणी पाणी आणण्यासाठी जात असताना वारंवार पाठलाग केला. यामुळे पीडित तरुणीने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला याबाबत सांगितले.दरम्यान, अल्पवयीन आरोपी पीडित मुलीच्या गिरणी जवळ आला. त्यावेळी गिरणीतील पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याला याठिकाणी येयचे नाही असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी व तिची आई त्याठिकाणी आले. त्याचवेळी आरोपीची आई आणि मुलगी त्याठिकाणी आले. त्यांनी पीडित तरुणी व तिच्या आईला शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.