भावाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरूणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार हडपसर परिसरातील साडेसतरा नळी येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.25) रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान गोसावी वस्ती येथील मनपा शाळेसमोर घडला आहे.
याबाबत प्रतीमा आनंद काटकर (वय-40 रा. साईबाबा मंदिराजवळ, साडेसतरा नळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सनी भोसले (वय-21), काळु सावंत (वय-23 रा. गोसावी वस्ती, साडेसतरा नळी, हडपसर) व त्यांचा एका मित्रावर आयपीसी 324, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीचा मुलगा यश (वय-19) व त्याचा मित्र राजु नांगरे यांना किरकोळ कारणावरुन हाताने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचा दुसरा मुलगा आदेश हे मनपा शाळेसमोर गेले. त्याठिकाणी आरोपींनी दोघांना शिवीगाळ केली. तर सनी भोसले याने त्याच्या हातातील कोयत्याने आदेश याच्या पाठीत मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.