Latest Marathi News
Ganesh J GIF

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,पाठीवर हात ठेवुनी फक्त लढ म्हणा… हातात घड्याळ बांधताच आढळराव पाटलांची फटकेबाजी

लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे. या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो. चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आढळराव पाटील यांनी मंगळवारी शिरुर येथील कार्यक्रमात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासर्हतेवरच शंका उपस्थित केली. त्यांनी म्हटले की, मलाही दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. पण मी तिसऱ्यांदा हा पुरस्कार घेतला नाही. आमचे श्रीरंग बारणे यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यावरुन ओळखा हा संसदरत्न पुरस्कार काय आहे ? अमोल कोल्हे हे संसदरत्न पुरस्कार घेऊन टेऱ्या बडवत आहेत, अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लक्ष्य केले. मला फेकाफेकी करता येत नाही. मी हाडाचा राजकारणी नाही. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. माझा राजकीय प्रवास आणि इतिहास तुम्हाला माहितीच आहे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवुनी फक्त लढ म्हणा या उक्तीप्रमाणे मी अमोल कोल्हे यांनी पराभव केल्यानंतर ही विकास कामं करत राहिलो, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.

पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या जुन्या विरोधकांशी राजकीय पॅचअप केले. त्यांनी दिलीप वळसे पाटील आणि दिलीप मोहिते पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. दिलीप वळसे पाटील आणि माझे सलोख्याचे संबंध होते. मात्र राजकारणात महत्वाकांक्षा वाढते. यातून आमच्यात वाद झाले. मात्र, आम्ही कधीही एकमेकांवर कोणतेही वैयक्तिक भाष्य केले नाही. 2004 साली मी लोकसभेत आणि दिलीप वळसे यांनी विधानसभेत उभं राहायचं ठरलं. त्यावेळी मला शिवसेनेकडून उभं राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी ऑफर दिली. मी 35 दिवसांत खासदार झालो. बाळासाहेबांनी विश्वास दाखवल्यानं मी खासदार होऊ शकलो. पहिली निवडणूक ही न विसरणारी आहे, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. माझे खऱ्या अर्थाने जवळचे मित्र म्हणजे दिलीप मोहिते पाटील. माझा आणि त्यांच्यात वैयक्तिक कोणतेच वाद नाहीत. विरोधात असल्यावर भांड्याला भांडं लागतं. पण राजकीय समीकरण बदलली की ती मान्य करायची असतात. दिलीप मोहिते तसा मोठया मनाचा माणूस. आम्ही फक्त जनतेच्या प्रश्नांसाठी भांडायचो, असे सांगत आढळराव पाटलांनी मोहिते पाटील यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

वीस वर्षानंतर मी स्वगृही परतत आहे. आपल्या सहकार्याने मी यशस्वी कारकीर्द पाडत आलोय. महाविकासआघाडी असताना उद्धव ठाकरेंनी मला पुणे लोकसभेची तयारी करायला सांगितली. मात्र मी त्यास नकार दिला. सुदैवाने राजकीय समीकरण बदलली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिरूर लोकसभा शिंदे गटाला सुटेल हे ठरलं. मात्र अलीकडच्या अजित पवार महायुतीत आले आणि पुन्हा समीकरण बदलली. मुख्यमंत्री म्हणाले ही जागा अजित पवारांना सुटणार. मात्र भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येत माझ्या नावाला संमंती दिली. मी अजित दादांचे आभार मानतो, त्यांच्याकडे अनेक नावांचे पर्याय असताना त्यांनी मला संधी दिली, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!