
व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. तसेच मी इथला भाई आहे, तुला माहित नाही का? अशी धमकी देऊन व्यावसायिकाच्या चारचाकी गाडीच्या काचा फोडून दहशत पसरवली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी 10 ते 11 जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.25) सांयकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास बोपखेल येथे घडली.
याबाबत अभिजित ओमप्रकाश अगरवाल (वय-35 रा. शितळादेवी मंदीर जवळ, बोपखेल) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोन्या तांबे, आकाश अर्जुन गिरीगोसावी (वय-30 रा. पाटील वाडा, बोपखेल), विक्री पिल्ले, शुभम अहिरवार, अजय पिल्ले याच्यासह इतर पाच ते सहा जणांवर आयपीसी 395, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर आकाश गिरीगोसावी याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्याच्या घराजवळ अल्टो कार पार्क केली होती. ते गाडीजवळ आले असता आरोपी हातात कोयते घेऊन त्यांच्या जवळ आले. त्यांनी फिर्य़ादी यांना कोयत्याचा धाक दाखवून मी इथला भाई आहे, तुला माहिती नाही का? अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी फिर्य़ादी यांच्या पॅन्टच्या खिशातून जबरदस्तीने 560 रुपये काढून घेतले. यानंतर फिर्यादी यांच्या कारच्या पुढील आणि डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर कोयता मारुन दहा हजार रुपयांचे नुकसान केले. तसेच हातातील काठ्या, कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.