
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे.पुण्यातील बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजार रुपयांची पिस्टल आणि 800 रुपयांचे दोन काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरात केली.

ओमकार विनोद पवार (वय-25 रा, अप्पर बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व संजय जाधव यांना माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुलटेकडी परिसरात एक संशयित पिस्टल जवळ बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने गुलटेकडी परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्टल व दोन काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पिस्टल व काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी ओमकार पवार हा सराईत गुन्हेगार बंटी पवार गँगमधील सक्रिय गुन्हेगार आहे. बंटी पवार सध्या मोक्का केसमध्ये येरवडा कारागृहात बंद आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई,सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी,संजय जाधव, शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, साधना ताम्हाणे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, पुष्पेंद्र चव्हाण, नागेश राख यांच्या पथकाने केली.

