
माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी वेगवेगळे राजकीय डावपेच सुरूवातीपासून टाकून महायुतीला चांगलेच धक्के दिले आहेत. पवारांनी सूत्रे फिरवल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबाने भाजपविरोधात बंड करत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.त्यानंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना पवारांनी उमेदवारी दिली. आता शिंदेंच्या शिवसेनेचे करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात शरद पवारांना यश आले आहे. नारायण पाटील यांनी आज पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अभयसिंह जगताप आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांचे बंड थंड करण्यात देखील शरद पवारांना यश आले आहे. आता नारायण पाटील यांना पवारांनी गळाला लावून दूसरा मोठा धक्का महायुतीला दिला आहे.करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आहेत.त्यामुळे नारायण पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश सोहळ्यावेळी नारायण पाटील उपस्थित होते.त्यामुळे तेही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे म्हटले जात होते. अखेर या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले.माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील तसेच वंचितचे रमेश बारसकर यांच्यात थेट लढत होणार आहे.