
चांदीची मूर्ती घेण्याचा बहाणा, मालकाला बोलण्यात गुंतवून 19 लाखांचे दागिने पळवले; चोरीची घटना CCTVमध्ये कैद
चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत सहकाऱ्याने ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचे सोन्याचे दागिने पळविली असल्याची घटना येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स मध्ये घडली आहे.याप्रकरणी राकेश गोपीलाल जैन (-४४, रा. नीता पार्क कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विमानतळ रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात ६ चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) रोजी सकाळी ११ च्या सुमारास महावीर ज्वेलर्स येरवडा बाजार येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत. फिर्यादी राकेश जैन हे सकाळी ११ वाजता दुकानात एकटे असतांना ६ चोरट्यांचे टोळके महावीर ज्वेलर्स मध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने घुसले. यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले.यामुळे फिर्यादी काऊंटरवरून उठून बाजूला असलेल्या शोकेरा मधील मूर्ती दाखवायला गेले. चोरट्यांनी मूर्ती पहिल्या पण ते काही घेतल्या नाही. या दरम्यान फिर्यादी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्याने काउंटरच्या ड्रावरमध्ये ठेवलेले पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, मणी, मंगळसूत्रातील वाटी, सोन्याच्या ९ अंगठ्या, असा १९ लाख १८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.