पुणे दि २५ (प्रतिनिधी)- तरुणीचे लग्न ठरल्याने तिने खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी नितीश सुडके ऊर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीश हा एका खासगी क्लासेसमध्ये गणित विषय शिकवतो. यावेळी तक्रारदार तरुणीनेही त्याच्याकडे गणित विषयासाठी क्लास लावला होता. त्यामुळे आरोपी शिक्षक आणि तरुणी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.पण तक्रारदार तरुणीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरविल्याने तिने नितीशला संबंध न ठेवण्यास सांगितले. तरीही तो तिला भेटून तक्रारदार तरुणीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.पण त्याचबरोबर तरुणीचा पाठलाग करीत असे. ज्या मुलासोबत फिर्यादीचे लग्न जमले आहे, त्या मुलाला आरोपीने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली त्यामुळे सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.