
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं – अजित पवार
२००४ साली जर राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर आजपर्यंत ते कायम राहिलं असतं. आज शरद पवार जे सांगतायेत ते धादांत खोटे आहे.मुख्यमंत्रिपद न घेण्यामागे काही ना काही कारण आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे.मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यात अजित पवारांनी सांगितलं की, २००४ बद्दल शरद पवारांनी काही विधान केले, त्यावेळी जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता तर पक्ष फुटला असता असं ते बोलले. परंतु हे धादांत खोटे आहे. मी त्यावेळी होतो, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा हे आम्हाला वाटत होतं. त्यावेळी मला मुख्यमंत्रिपदात रस नव्हता. छगन भुजबळ हे मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं, पक्ष स्थापनेपासून भुजबळांनी गावोगावी जात संघटना वाढवण्याचं काम केलं होतं. त्या काळात इतकं वातावरण निर्माण होऊनही राष्ट्रवादीला ५८ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या असं त्यांनी सांगितले.
तसेच १९९१ शरद पवारांना संरक्षण मंत्री केंद्रात जायची वेळ आली तेव्हा बहुतांश आम्ही सगळे काँग्रेस आमदार सेवासदनला बसले होते. तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आमदारांच्या बैठकीत पद्मसिंह पाटलांचं नाव पुढे आलं होतं, त्यावेळी सुधाकरराव नाईकांचं नावही चर्चेत नव्हतं. सुधाकरराव नाईक यांच्या हाताखाली आम्ही सगळ्यांनी काम केले. केंद्रात जाताना शरद पवारांनी पद्मसिंहांना खुर्ची न देता नाईकांना पुढे आणलं आणि सरकार बनवलं. १९९१ नंतर १३-१४ वर्षांनी अशी संधी आली होती तेव्हा कुणी नवखे होते हे म्हणायचं कारण नव्हतं. पण आता काहीपण सांगतायेत असंही अजित पवारांनी म्हटलं.नाईकांना मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांनी १ वर्षही साहेबांचं ऐकलं नाही. १७ लोकांना आम्हाला मंत्रिमंडळातून काढलं. तिथून सगळी गडबड झाली. २००४ ला कदाचित हा विचार शरद पवार-प्रफुल पटेल यांच्यात झाला असेल की, १९९१ ला मुख्यमंत्री करून एक वर्षात कुणी ऐकलं नाही आता जर मुख्यमंत्री केले तर आपल्या दोघांना कायम दिल्लीला पाठवतील. त्यामुळे मुख्यमंत्री पद घेतले नसेल. काही ना काही कारण आहे. २००४ ला मुख्यमंत्रिपद घेतले असते तर तिथून कायम राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राहिला असता असा दावा करत अजित पवारांनी आपण पुन्हा जोमाने कामाला लागू. युद्धात आणि तहात दोन्हीत जिंकू असं आवाहन कार्यकर्त्यांना केले.
निवडणुकीच्या निमित्ताने बराच अनुभव आला, रोज सकाळी १० वाजता भोंगा वाजतो, तो भोंगा वाजला की त्याला उत्तर द्यायचं. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक असताना कुठेतरी जातीपातीचा विचार केला जात होता. अल्पसंख्यांकांना चांगल्या प्रकारे निधी या सरकारने दिलं होतं. वक्फ बोर्डाचे अनेक प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवले होते. काहीही झालं शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा राष्ट्रवादीनं सोडली नाही, यापुढेही सोडणार नाही विकासपुरुष म्हणून आम्ही मोदींसोबत आलो आहे. कुठल्याही देशाने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. आपल्या आजूबाजूचे देश कुठे काही गडबड करणार नाहीत अशी परिस्थिती देशाने तयार केली आहे असं अजित पवारांनी ठाम सांगितले.संविधान वाचवा, लोकशाही वाचवा असं नॅरेटिव्ह तयार करण्यात आलं. आम्ही सगळेजण बेंबीच्या देठापासून सांगतोय, संविधान बदललं जाणार नाही. संविधान दिन या सरकारने सुरू केले. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव काँग्रेसनं केला होता. मात्र लोक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ५ वर्ष कितीही काम केले तरी भारतीयांची शॉर्टटर्म मेमरी असते. गेल्या ३-४ महिन्यात काय घडतंय त्यावर विचार केला जातो असं अजित पवारांनी सांगितलं.
आम्ही एकत्रित काम करताना शिवसेनेबाबत टोकाची भूमिका घ्या असं आम्हाला सांगितलं जायचं. शिवसेनेला विरोध केल्यावर अल्पसंख्याक खुश होतात असं सांगितले जायचे. मात्र आज अल्पसंख्याक शिवसेनेसोबत गेलेत, त्यामुळे कधी काय होईल माहिती नाही. बीडमध्ये जातीपातीत निवडणूक लढली जाते. आपण शिव-शाहू-फुले आंबेडकर विचारधारा बोलतो आणि अशी परिस्थिती आहे. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होणार नाही. कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी विचारधारेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस तडजोड करणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केले.