
मैत्रिणीचे खासगीतील फोटो अश्लील कॅप्शन लाईन लिहून तिच्या आई-वडील व मित्रांना पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी विनयभंग,आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.हा प्रकार 29 मे सायंकाळी सहा ते 4 जून 2024 या कालावधीत हडपसर परिसरात घडला आहे.
याबाबत 25 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि.4) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शुभम अर्जुन मार्कड (वय-27 रा. दौंड) याच्यावर आयपीसी 354, 354(क), 354(ड), 500, 506, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांचे मित्र-मैत्रिणी आहेत. आरोपी शुभम याने 29 मे रोजी फिर्य़ादी यांना वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने हडपसर परिसरात बोलावून घेतले.
शुभमच्या बोलवण्यावरुन फिर्य़ादी हडपसर येथे आल्या. आरोपीने हडपसर परिसरातील एका फ्लॅटवर नेऊन तरुणीला अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर त्याने तरुणीची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे न्यूड फोटो व व्हिडीओ तिच्या आई-वडील व मित्रांना पाठवून बदनामी केली. फोटो व व्हिडीओ पाठवताना त्याने अश्लील टॅग लाईन लिहिली. तसेच फिर्य़ादी यांना वारंवार भेटण्यासाठी दबाव टाकून संपर्कात राहण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.