
कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळ्याने एका दुकानदारावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच दुकानाची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवून इतर दुकानांची देखील तोडफोड केल्याचा प्रकार हडपसर भागातील साडेसतरानळी चौकात घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.12) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रविराज पान शॉप अँड जनरल स्टोअर्स येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जखमी राजेशकुमार सत्यनारायण सिंग (वय-35 रा. मांजराई व्हिलेज सोसायटी, मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल जगन्नाथ गाडेकर (वय-29 रा. साडेसतरानळी तोडमल वस्ती, हडपसर) व इतर तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 307, 324, 323, 504, 506, 34 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे साडेसतरानळी चौकात दुकान आहे. बुधवारी रात्री ते दुकानात असताना त्यांच्या परिसरात राहणारे आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडे कोल्ड्रींगच्या 40 बाटल्या मागितल्या. मात्र, फिर्यादी यांनी कोल्ड्रींग देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. मात्र, कोयत्याचा वार मानेवर बसल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी यांच्या दुकानातील वस्तूंवर कोयता मारुन नुकसान केले.यावेळी परिसरातील लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवून फिर्यादी यांच्या दुकाना शेजारी असलेल्या इतर दुकानातील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच हातातील कोयते जमलेल्या लोकांना दाखवून शिवीगाळ करुन दहशत पसरवून निघून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.