खरकटे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरुन एका तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चार जणांच्या टोळक्याने लोखंडी अँगलने व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चिखली परिसरात घडली आहे.याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.16) रात्री नऊच्या सुमारास नेवाळे वस्ती येथे घडली.
राहुल परमेश्वर राय, रंजन राय, कुंदनकुमार जवाहिर राय (सर्व रा. नेवाळे वस्ती, चिखली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आनंदकुमार जयशंकर राय याच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुनिलकुमार दुर्गा यादव (वय-20 रा. बर्ड इंटरनॅशनल शाळेसमोर, चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातेवाईक सुदाम मेहतो याने खरकटे पाणी रस्त्यावर टाकले. ते पाणी आरोपींच्या अंगावर उडाले. याच कारणावरुन आरोपींनी सुदाम याला शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी सुदाम याची आरोपींच्या तावडीतून सुटका करुन एका खोलीत बंद केले.
त्यानंतर फिर्यादी आरोपींना समजावून सांगत होते. त्यावेळी भांडण सोडवल्याच्या रागातून आरोपींनी याला ठार मारा असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तर आरोपी राहुल राय याने त्याच्या हातातील लोखंडी अँगलने फिर्यादी याला डोक्यात व शरीरावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.