सोमाटणे फाटा येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात पाच जणांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन दरोडा टाकला. मात्र, दुकानातील कामगार आणि ग्राहकांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न फसला . हा प्रकार सोमटणे फाटा येथील पवीत्रा सोनी ज्वेलर्स दुकानात गुरुवारी (दि.27) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. दरम्यान आरोपींनी एका घरात घसून दोन तरुणांना मारहाण करुन घरातील सामानाची तोडफोड केली.
ज्वेलर्सचे मालक गिसुलाल बन्सिलाल सोनी (वय-53 रा. हिंजवडी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम सुरेश सोनवणे (वय-21 रा. कोतुरणे, पवनानगर, ता. मावळ), अमित मच्छिंद्र शेटे (वय-35 रा. बालाजीनगर, चाकण) यांना अटक केली आहे. तर बिट्या उर्फ योगीराज विश्वनाथ मुऱ्हे (वय-36 रा. सोमाटणे), लहु अशोक भालेकर (रा. विठ्ठलवाडी, सोमाटणे), सुरज गायकवाड (रा. फुरसुंगी, हडपसर) यांच्यावर आयपीसी 387,398,504,506(2), सह आर्म अॅक्ट, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सोमटणे फाटा येथे पवीत्रा सोनी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी दुकानातील सेल्समन यांच्या सोबत काम करत होते. त्यावेळी आरोपी इनोव्हा (एमएच 12 इ.टी. 7773) गाडीतून आले. त्यांनी दुकानात येऊन शिवीगाळ, धमकी देऊन त्यांच्याकडील धारदार हत्याराचा धाक दाखून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. तसेच दरमहा हप्ता देण्याची मागणी करुन सेल्समन ओमप्रकाश सोनी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी दुकानातील सोने जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानातील ग्राहक आणि कामगारांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक जमा होऊ लागल्याने आरोपी कारमधून पळून गेले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली.
दरम्यान, विशाल विष्णू तोरसल्ले (वय-29 रा. डोफोडिल्स अव्हेन्यु सोसायटी, सोमाटणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर आयपीसी 452,324,323,506,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास फिर्य़ादी यांच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकी दिली. तसेच घरातील लॅपटॉप, टेबल फॅन व इतर सामानाची तोडफोड करुन इनोव्हा गाडीतून पसार झाले. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.