
लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. पतीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २) धनकवडी येथे घडला आहे.

शिवानी दीपक दामगुडे (२४, रा. सुवर्णयुग शाळेच्या मागे, धनकवडी) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती दीपक विठ्ठल दामगुडे (३०) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत शिवानीचे वडील काशीनाथ काळू राऊत (५०, रा. कोपरखैरणी, नवी मुंबई) यांनी बुधवारी (दि.३) सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचे २०१९ मध्ये दीपक दामगुडे याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पतीने शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण केली. या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने पतीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राऊत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करूून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बेरड करत आहेत.



 
						 
			