
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा पाठलाग करुन टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी भागात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संदीप नरसिंग चव्हाण (२५, रा. राया रेसीडन्सी, पोकळे वस्ती, धायरी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी गणेश चंदू जायगुडे (१८, रा. गणेश रेसीडन्सी, पोकळे वस्ती, धायरी) आणि प्रशांत उर्फ सोन्या प्रकाश काेळी (१८, रा. वरदविनायक हाईट्स, धायरी) यांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी (दि. ३) रात्री पावणे अकराच्या सुमारास चव्हाण आणि त्याचे मित्र धायरी परिसरात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी जायगुडे, कोळी आणि साथीदार तेथे आले. मन्या कुठे आहे? अशी विचारणा आरोपींनी केली. मन्याला आज मारून टाकणार आहोत, अशी धमकी दिली.चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेले मित्र घाबरून पळाले. शिव विहार सोसायटीच्या आवारात चव्हाण घसरून पडला. आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. नडगीवर कोयत्याचा दांडा मारून जखमी केले. पसार झालेल्या जायगुडे, कोळी यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.



 
						 
			