
बहिणी बद्दल चॅटिंग केल्या बाबत वडिलांना सांगितल्याच्या कारणावरुन आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पाठलाग करुन धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.7) रात्री पावणे अकराच्या सुमारास पांडवनगर येथील सार्वजनिक रोडवर घडली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत इसाक फिरोज पठाण (वय-19 रा. पठाण वस्ती, जुनी वडारवाडी, पुणे) याने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शोएब मेहबुब सय्यद (रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर, पुणे), अबु शेख, आयुष साठे (दोघे रा. वीर सावरकर बस स्टॉपमागे, जनवाडी, पुणे) यांच्यासह पाच ते सात जणांवर भान्यासं 118(1), 352, 189(4), 190, 191(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब सय्यद याने त्याचा मित्र दक्ष नलावडे याच्यासोबत फिर्यादी इसाक याच्या बहिणीबद्दल चॅटिंग केले होते. याबाबत इसाक याने शोएबच्या वडिलांकडे तक्रार केली होती. याचा राग शोएबच्या मनात होता. रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास फिर्यादी इसाक आणि त्याचा मित्र पांडवनगर येथील ताशकंद बेकरी समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते.
त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन शिवीगाळ करत त्याठिकाणी आले. चॅटिंग बाबत वडिलांना सांगितल्याच्या रागातून शोएब याने इसाक याला शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने वार केले. त्यावेळी त्याने वार अडवण्यासाठी हात मध्ये घातला असता हाताला गंभीर दुखापत झाली. घाबरलेल्या इसाक याने आरोपींच्या तावडीतून सुटका करुन तिथून पळून गेला. आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्याला गाठले. अबु शेख याने त्या ठिकाणी पडलेला दगड उचलून इसाक याला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.