
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी येरवडा कारागृहातून पळून गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर (वय-34 रा. पो. देवीपाडा, हरोसाली ता. वाडा, जि. पालघर) असे या कैद्याचे नाव आहे. याबाबत तुरुंग अधिकारी हेमंत दिनकर पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शहापुर पोलीस ठाण्यातील 2009 मध्ये झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात आत्माराम भवर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याला खुनाच्या गुन्ह्यात 10 जुलै 2012 रोजी जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला खुल्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
शनिवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान पोलीस अंमलदार तौसीफ सय्यद हे सर्व कैद्यांची गणती करत होते. त्यावेळी भवर हा बरॅकमध्ये आढळून आला नाही. कारागृहात शोध घेतला असताना कोठेही मिळाला नाही. त्यामुळे तो पळून गेल्याचे लक्षात आले. आत्माराम भवर कधी कसा पळून गेला, याबाबत काहीही माहिती अद्याप समोर आली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.