आगामी विधानसभा निवडणूक राज्यातील महाविकास आघाडीसह महायुतीसाठी महत्त्वाची आहे. कारण मागील पाच वर्षात राज्यात तीन सरकारं स्थापन झाली. त्यात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.परंतू, शिवसेनेत सध्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागाला होता. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटासह राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षासाठी ही निवडणूक महत्त्वाची झाली आहे. एकीकडे निवडणुकीची चर्चा असतानाच पुढचा मुख्यमंत्री कोण यावरही युती-आघाडीत चर्चांना उधाण आलं आहे. अशात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री कोण असतील यावर अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, “पुढील विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत. जसे लोकसभा निवडणूक आम्ही मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढवू आणि जिंकू. महायुतीचे पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे हेच असतील”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. शिवाय, ‘आगामी विधानसभा निवडणुकीत काही नवीन चेहऱ्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून संधी देण्यात येईल’, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तसेच, हे दोन्ही उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. यावेळी अजित पवारांनी इतर पक्षातील आमदारांना प्रलोभन दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. परंतु, या चर्चांना अजित पवारांनी पुर्णविराम दिला आहे. त्यानुसार, “विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याही आमदाराची मते आम्ही फोडली नाही. काही आमदार यांना फक्त विनंती केली होती. मात्र, त्यांना कोणतेही प्रलोभन दाखविले नाही”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.