यशश्री हत्याकांडात पोलिसांचा मोठा खुलासा; ‘दोघे मित्र होते, 3 ते 4 वर्षांपासून संपर्कात नव्हती’ म्हणून घडल हे सगळ
उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी मोठे खुलासे केले आहेत. मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असा खुलासा नवी मुंबई पोलिसांनी केला आहे. मुख्य आरोपी दाऊद शेखला ताब्यात घेतल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत संपूर्ण घटनाक्रम उलगडला.
मयत आणि आरोपीत ओळख, मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती त्याच्या संपर्कात नव्हती. यातूनच त्याने हे कृत्य केलं असावं असं दिसत आहे. अजून पूर्ण चौकशी झालेली नाही, त्यामुळे नेमकं सांगणं थोडं कठीण आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. दोघांचा संपर्क झाला होता. घटना घडली त्या ठिकाणी भेटण्याचं त्यांचं ठरलं होतं. अपहरण वैगेरे काही नाही. ते एकमेकांना ओळखत होते. वाद झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला अशी शंका आहे अशी माहितीही त्यांनी दिली. तसंच चेहऱ्यावर कदाचित कुत्र्यांनी लचके तोडले असं सांगत आपण शवविच्छेदनाची वाट पाहत असल्याची माहिती त्यांनी दिली.
“25 तारखेला पीडितेच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी रात्री आम्हाला मृतदेह सापडला. शनिवारी सकाळी आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला होता. आज पाचवा दिवस आहे. डीसीपी क्राईम आणि झोन 2 पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 8 पथकं काम करत होती. आम्ही दोन टीम बंगळुरु आणि दोन टीम यादगीर जिल्ह्यात पाठवल्या होत्या. नातेवाईक आणि मित्रांच्या चौकशीत तसंच तांत्रिक तपासात 2 ते 3 संशयित सापडले होते. अनुभवावरुन आम्हाला आरोपी कर्नाटकात आहे असं वाटत होतं. येथे आम्हाला जे काही इनपुट्स मिळत होते ते त्या पथकांना दिले जात होते. याच्या आधारे आज सकाळी दाऊद शेख या मुख्य संशयिताला ताब्यात घेतलं आहे,” अशी माहिती दीपक साकोरे यांनी दिली.
“घटना घडल्यानंतर आम्हाला त्याचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं. पण तो कर्नाटकाचा आहे एवढी माहिती होती. त्यानंतर घरी, नातेवाईक सर्वांकडे चौकशी केली. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे अल्लर येथून आज पहाटे त्याला ताब्यात घेतलं,” असंही त्यांनी सांगितंल. मोसीन नावाच्या आरोपीलाही ताब्यात घेतलं आहे का? असं विचारलं असता त्यांनी नकार दिला. “मोसीन पीडितेच्या संपर्कात होता. आम्ही तिच्याशी संपर्क साधणाऱ्या सर्वांची चौकशी केली. आम्हाला 3 ते 4 जण संशयित वाटत होते. त्यापैकी दाऊदला ताब्यात घेतलं असून, त्याने कबुली दिली आहे. सध्या इतर कोणताही संशयित नाही”, असंही ते म्हणाले.