(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – चांदणी बारमध्ये ‘मित्राला कशाला मारता’ असे विचारल्याने चौघा जणांनी तरुणावर धारदार वस्तूने मारहाण करुन जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत गौरव बाळासाहेब लोंढे, वय ३८ यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून वारजे माळवाडी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली. त्यानुसार पोलिसांनी भूषण बोराटे व त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. हा कर्वेनगरमधील चांदणी बारच्या बाजूला रोडवर गुरुवारी पहाटे सव्वा वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र मंदार मुळीक हे चांदणी बारमध्ये दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा भूषण बोराटे हा तेथे आला. त्याने मंदार मुळीक याचा गळा पकडला. म्हणून फिर्यादी यांनी त्यास गळा का पकडतो, असे विचारले. त्यावर त्याने तुझा काय संबंध मला विचारायचा, असे बोलून फिर्यादीला शिवीगाळ केली. व तो आतमध्ये निघून गेला. त्यानंतर त्यांचा मित्र मंदार मुळीक हाही निघून गेला. त्यानंतर पहाटे एक वाजता फिर्यादी चांदणी बारमधून बाहेर पडले.
कर्वेनगरला घरी जात असताना भूषण बोराटे व त्याचे तीन मित्र आले. बारमध्ये झालेल्या भाषणाचा राग मनात धरुन त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. भूषण बोराटे याने हातातील धारदार वस्तूने त्यांच्या उजव्या हातावर वार केला. त्याचवेळी त्यांचा मित्र विकी नलावडे व तुषार लोंढे तेथे आले. त्यांनी जखमी अवस्थेत फिर्यादी यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस फौजदार निगडे तपास करीत आहेत.