(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. यशश्रीचा गायब झालेला मोबाईल अखेर पोलिसांना सापडला आहे. या मोबाईलमधून यशश्रीच्या हत्येचा उलगडा होणार आहे. पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागण्याची शक्यताही या निमित्ताने वर्तवली जात आहे. नवघर पोलीस स्टेशनच्या परिसरातच हा मोबाईल सापडला आहे
यशश्रीचा मोबाईल पाण्यात भिजल्याने तो दुरुस्तीसाठी देण्यात आला आहे. त्यात दाऊद शेख आणि यशश्रीचे संभाषण रेकॉर्ड असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातून पोलिसांच्या हाती या प्रकरणाची बरीच माहिती मिळणार आहे. यशश्रीच्या या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ रेकॉर्डिंगही असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पण मोबाईल दुरुस्त झाल्याशिवाय त्यात काय आहे हे पाहणे आवश्यक आहे. या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटची माहितीही पोलिसांना मिळणार आहेत. त्यातूनही बराच उलगडा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
याघटनेच्या दिवशी यशश्रीने कुणाकुणाला फोन केला होता, ती कोणत्या कोणत्या परिसरात गेली होती, याची माहितीही पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मोबाईलमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरम्यान, यशश्री हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याची उद्या१ ३ ऑगस्ट रोजी पोलीस कोठडी संपत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले नव्हते. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. उद्या त्याची कोठडी संपत असल्याने त्याची कोठडी वाढते की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.