रेनकोटवरुन झालेल्या वादातून एका तरुणाचा भर रस्त्यात चाकूने खुपसून खून करण्यात आला. ही घटना झिल कॉलेज चौकात रविवारी रात्री घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य श्रीकृष्ण वाघमारे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश भिलारे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही ॲमेझॉन कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रविण भारत मोरे याने तक्रार दिली आहे. फिर्यादी हे ओला कार चालक आहेत. तर मयत आदित्य हा त्यांच्यासोबत रुमवर रहात होता. तो दिवसा डॉमिनोजमध्ये तर रात्री अमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याची आणि आरोपीची दुपारी भांडणे झाली होती. आदित्यने दुपारी घरी येऊन फिर्यादीला सांगितले की, मला डॉमिनोजमधील मॅडमने रेनकोट दिला होता. तो सुरेशने मला काढायला भाग पाडले. यानंतर आमच्यात वाद झाले तेव्हा तो माझ्या बोटाला चावला. आपण त्याला भेटुन वाद मिटवू असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादीने सुरेशला रात्री फोन केला. मात्र सुरेशने फोनवर बोलण्यास नकार देत नऱ्हे येथील हॉटेल मराठा येथे भेटायला बोलावले. यामुळे फिर्याद प्रविण मोरे, आदित्य, रतन शिंगाडे, सचिन तांगडे असे सर्व रुममेट त्यांच्या कारमधून सुरेशला भेटायला गेले. तेथे सुरेशने आदित्यला उद्देशून शिवी दिल्याने आदित्यने सुरेशच्या कानाखाली मारली. यामुळे सुरेशने त्याच्या पँटच्या खिशातील लपवलेला चाकू काढून आदित्यच्या डाव्या काखेजवळ मारला.
यामुळे आदित्य घाबरुन झिल कॉलेजच्या दिशेने पळू लागला. त्याच्या मागे सुरेशही पळत गेला. थोड्याच अंतरावर आदित्यला पकडून छातीत चाकू मारला. यामुळे आदित्य रस्त्यावर कोसळला. कारमधून फिर्यादीसह तीघे तेथे पोहचले. तेव्हा आरोपीने चाकू दाखवत त्यांना रोखले. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांनाही त्याने चाकू दाखवत धमकावले. यामुळे त्याच्या जवळ जाण्याची कोणीच हिम्मत दाखवली नाही. यानंतर सुरेश तेथून पळून गेला. आदित्यला रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषीत करण्यात आले.