हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथील तलाठी कार्यालयात शेतीविषयक कागदपत्रांसाठी आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूने भोसकल्याची खळबळजनक घटना बुधवारी (२८ ऑगस्ट) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. संतोष देवराव पवार असे खून झालेल्या तलाठीचे नाव आहे.
आडगाव (रंजे.) सज्जाचे तलाठी संतोष पवार हे बुधवारी दुपारी तलाठी सज्जा कार्यालयात कामकाज करत होते. एक जण कामाबाबत त्यांच्याकडे आला. या दोघांत वाद झाला आणि त्या व्यक्तीने पवार यांना भोसकले. पवार यांनी आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी तलाठी पवार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी जखमी पवार यांना परभणी येथे उपचारासाठी हलविले, परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, हट्टा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी भेट दिली. घटनेप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मयत तलाठी संतोष पवार यांच्या मृतदेहाचे परभणी येथे शवविच्छेदन होणार असून, त्यानंतर त्यांचा मृतदेह मूळ गावी सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथे आणला जाणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई- वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांचा ताफा आडगाव रंजे येथील तळ ठोकून होता. याप्रकरणी बोरी सावंत येथील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती हट्टा पोलिसांनी दिली आहे.