पिंपरी – पोलीस असल्याचे सांगून पाच जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन जाणार्यांना दमदाटी करुन त्यांच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, घड्याळ असा २ लाख रुपयांचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. रात्रभर डांबून ठेवून त्यांना पंढरपूर येथे सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. योगेश विश्वास सावंत (वय ३४) आणि ज्ञानेश्वर विलास घाडगे (वय २६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभम यशवंत कुलकर्णी (वय २१, रा. गायकवाडनगर, पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकासर जांबे गावातून पंढरपूर दरम्यान २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र अभ्युदय चौधरी हे मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी एक लाल रंगाची स्वीप्ट कार व एक पांढर्या रंगाची कार यामधून पाच जण आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रास जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांना पोलीस आय डी कार्ड दाखवून २ कोटी रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांच्या ५० हजार रुपयांच्या ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, १ लाख २५ हजार रुपयांचे २५ ग्रॅमची सोन्याची चैन व १५ हजार रुपयांचे अॅपल कंपनीचे वॉच जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना हाताने मारहाण करुन एका अज्ञात ठिकाणी रात्रभर डांबुन ठेवले. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे सोडून देऊन निघून गेले. त्यानंतर त्यांनी पुण्यात आल्यावर फिर्याद दिली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.