धक्कादायक…! मित्राला जेलमध्ये पाठविण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलीने केला सामूहिक बलात्कार केल्याचा बनाव
जुन्या मित्राला जेलमध्ये पाठविण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा बनाव रचल्याचा धक्कादाय प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. पोलीसांनी तत्परता दाखवत यासंदर्भात तपास केल्याने या घटनेची सत्यता उघड झाली. शुक्रवारी(दि १३) दुपारी ३.३० च्या सुमारास एका अल्पवयीन मुलीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते मच्छींद्र टींगरे यांना रडत रडत फोन करुन सांगितली. मला शाळेतून उचलुन नेले. एका ऊसाच्या शेतात नेवून त्या मुलाने आणखी ३ मुलांना बोलावून घेत माझ्यावर सामुहिक अत्याचार केल्याचे त्या मुलीने टींगरे यांना सांगितले.त्यावर टींगरे यांनी घटनेचे गांर्भीर्य ओळखून त्या मुलीला धीर दिला. हा प्रकार तातडीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना कळविला.
त्यानंतर अवघ्या पाच ते दहा मिनिटात संपुर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली.तसेच तातडीने घटनास्थळी जात संबंधित मुलीला ताब्यात घेतले.संपुर्ण पोलीस यंत्रणा या ठीकाणी पोहचली. याबाबत ‘ओएसडी’ मार्फत ही घटना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचली.पवार यांनी देखील हा प्रकार गांभीर्याने घेत तातडीने कारवाइ करण्याच्या सुचना दिल्या. त्यांनीही तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना सर्वांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या.पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने या मुलीकडे तपास सुरु केला. मात्र,प्रत्येक वेळी त्या मुलीचे ‘स्टेटमेंट’ बदलण्यास सुरवात केली. पोलीसांनी सीसीटीव्ही तपासणी करीत तपास सुरु केला. तेव्हा तिच्या प्रत्येक वेळेसच्या उत्तरात काही वेगळेच पुढे येत होते. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांना मुलगी काहीतरी वेगळच सांगून दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी महिला पोलिस कर्मचारी व अधिका-यांची मदत घेत मुलीला विश्वासात घेतले.
त्यानंतर सत्य प्रकार पुढे आला. तिच्या नवीन मित्रासोबत ती बोलत होती .हे एका जुन्या मित्राला आवडत नव्हते.मात्र, सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यास त्या मित्राला जेलमध्ये पाठविणे शक्य असल्याचे तिला तिच्या मित्राने सांगितले.त्यातून पुर्वीच्या त्या मित्राला जेलमध्ये पाठविण्याच्या उद्देशाने त्या दोघांनी हा बनाव रचल्याचे अखेर स्पष्ट झाले. असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. एका मालिकेतील घटना बघून हे केल्याचे संबंधित मुलीने सांगितले. अल्पवयीन मुलीकडूनही अशी दिशाभूल व बनावाचा प्रकार पोलिसांनाही चक्रावून सोडणारा ठरला. मात्र, पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दाखविलेल्या प्रसंगावधानाचे काैतुक होत आहे. तसेच वेळीच तपास करुन सत्य उघड केले.एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या बनावाने संपूर्ण बारामती पोलीस यंत्रणा कामाला लावल्याने शहरात हा प्रकार दिवसभर चर्चेचा विषय ठरला.