बिहारच्या गया येथील आमस पोलीस स्टेशन हद्दीतील पथरा गावातील मठ टोला येथे एका विहिरीत पती-पत्नीचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. २० वर्षीय मिथिलेश कुमार आणि त्याची १८ वर्षीय पत्नी प्रियंका कुमारी अशी मृतांची नावं आहेत. घराजवळ एक विहीर आहे जिथे त्यांचे मृतदेह सापडले. या घटनेमागचं कारण समोर आलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिथिलेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीचं जेवण करून पती-पत्नी झोपायला गेले होते. ते कधी पडले किंवा त्यांनी विहिरीत कधी उडी मारली हे कळू शकलेलं नाही. दोघेही घरात दिसले नाहीत तेव्हा शोधाशोध करण्यात आली. यानंतर त्यांचा मृतदेह विहिरीत दिसला. यानंतर घटनेची माहिती आमस पोलीस ठाण्याच्या पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी अनुग्रह नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. एफएसएलच्या पथकानेही घटनास्थळ गाठून तपास केला.
मिथिलेशचे लग्न तीन महिन्यांपूर्वी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील हंटरगंज पोलीस स्टेशन क्षेत्रातील अनिल यादव यांची मुलगी प्रियंकासोबत झालं होतं. लग्नानंतर सर्व काही ठीक चाललं होतं. मात्र, या दोघांमध्ये रोज भांडणं होत असल्याची चर्चा आहे. यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता आहे. मात्र, हे तपासानंतर स्पष्ट होईल.