वडीलधाऱ्यांनी आमच्यावर कधी गोष्टी लादल्या नाहीत. आम्हाला जे वाटत होतं ते करण्याची मुभा त्यांनी आम्हाला दिली. यामुळे आम्हीही आमच्या पुढच्या पिढीला ही गोष्ट करू नको असं कधी सांगितलं नाही.त्यांना जे करावं वाटत असेल तर त्यांनी ते करावं. मात्र सगळ्या गोष्टींचा विचार करून ती गोष्ट करावी असं मी अमितला सांगितलं, असं अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात कसे उतरले या प्रश्नाचं उत्तर देताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे आज एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. यात त्यांनी हे भाष्य केले आहे. तसेच महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण याचं एक खळबळजनक उत्तर त्यांनी यावेळी दिले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, काम महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी ही आघाडी नाही. मी शिवसेनेत असतापासून माझ्या आयुष्यात दुसरा कोणत पक्ष आला असेल तर तो भाजप आहे. माझा कधी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत संबंध आला नाही. माझा फक्त भाजपसोबत संबंध आला आहे, अशी टीका त्यांनी मविआवर केली आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर त्यांनी दिले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, आमच्या साथीने महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल, असं उत्तर त्यांनी दिले आहे. तर याआधी छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, राज्यातील पुतण्याच्या डीएनएमध्ये काही समस्या आहे. त्यामुळे सगळीकडे पुतणे घोळ करतात.
यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, छगन भुजबळांनी सर्व पुतण्यांचा एक पक्ष काढावा. भुजबळही पुतण्यासोबत गेले होते. त्यांनी तरी त्यांच्या काकांची साथ सोडायला नको पाहिजे होती. मला अजित पवारांबद्दल एक गोष्ट आवडते. त्यांनी जातपात कधी मानली नाही, असं राज ठाकरे म्हणाले. मी कमजोर आणि कमकुवत नाही. लोकांसमोर जाईन. वेळ लागेल.पण एक दिवस लोक माझ्या हाती सत्ता देतील. शिवसेना आणि भाजपच्या हातात सत्ता यायला किती वर्षे गेली? हे फोडाफोडीचं राजकारण मी समजू शकतो. पण नाव घेणं चिन्ह घेणं हे योग्य नाही. अशा प्रकारचं राजकारण मला नाही आवडत, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.