Latest Marathi News
Ganesh J GIF

अवघ्या २०० रुपयांसाठी देशासोबत गद्दारी..! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला अटक, गुजरातमधून घेतले ताब्यात

अवघ्या दोनशे रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात केल्याने एका व्यक्तीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाकडून या तरुणाला अटक करण्यात आली आहे.आरोपीने काही संवेदनशील फोटो गोळा करून पाकिस्तानला पुरवले होते या संदर्भात त्याला अटक करण्यात आली आहे. दीपेश गोहिल असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दीपेश गोहिल नावाचा व्यक्ती ओखा बंदरात काम करत होता. गुजरातच्या किनारपट्टीवरील एका खाजगी कंपनीत काम करणारा दीपेश हा मजूर दररोज २०० रुपयांसाठी पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता. आणि फेसबुकच्या माध्यमातून तो पाकिस्तानी हेराच्या संपर्कात होता. गुप्तहेरने दीपेशशी फेसबुकवर ‘असिमा’ नावाने मैत्री केली आणि त्यानंतर ती व्हॉट्सॲपवरही त्याच्या संपर्कात राहिला. कथित असिमा हि पाकिस्तानी नौदलातील महिला अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला एजंटने दीपेशला ओखा बंदरात उभ्या असलेल्या तटरक्षक दलाच्या बोटीचे नाव आणि क्रमांक विचारला होता. गोहिलने द्वारकेतील ओखा भागातून संवेदनशील फोटो गोळा केले आणि ते पाकिस्तानला पाठवले, अशी माहिती एटीएसने दिली. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपाखाली गुजरात एटीएसने दीपेश गोहिलला अटक केली आहे. मात्र एजंटची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “ओखा येथील एक व्यक्ती व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तानी नौदल किंवा आयएसआयच्या एजंट्ससोबत तटरक्षक नौकेची माहिती शेअर करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. तपासानंतर आम्ही ओखा येथील रहिवासी दिपेश गोहिल याला अटक केली. दीपेश ज्याच्या संपर्कात होता तो पाकिस्तानचा होता. एटीएसच्या म्हणण्यानुसार, दीपेशला ओखा बंदरात उभ्या असलेल्या जहाजांमध्ये सहज प्रवेश मिळाला होता. पाकिस्तानी गुप्तहेरांना माहिती देण्यासाठी त्याला दररोज २०० रुपये मिळतात आणि त्याचे कोणतेही खाते नसल्याने त्याने हे पैसे त्याच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केले. त्यानंतर मित्राकडून रोख रक्कम घेतली आणि वेल्डिंगच्या कामासाठी पैसे असल्याचे सांगितले. आतापर्यंत दीपेशने संवेदनशील माहिती पुरवून सुमारे ४२ हजार रुपये कमावले होते. तटरक्षक दलाच्या बोटी तैनात असलेल्या भागापर्यंत दिपेश गोहिलची ओळख होती अशीही माहिती एटीएसने दिली. सध्या याप्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!