पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी ( 9 डिसेंबर) अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह निर्जन स्थळी फेकून देण्यात आला आणि मारेकरी फरार झाले. एका लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचे दिवसाढवळ्या झालेले अपहरण आणि हत्या यामुळे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली. मात्र या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अथक तपास करत अखेर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून या खुनाचा उलगडा झाला आहे. सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या व्यक्तीनेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. एका वैयक्तिक वादातून त्याने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे समोर आले आहे. अक्षय जवळकर असे मुख्य आरोपीचे नाव असून तोच या हत्येचा सूत्रधार आहे. त्यानेच वाघ यांच्या खुनासाठी पाच लाख रुपयांची सुपारी मारेकऱ्यांना दिली होती अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी भाडेकरूसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.पोलिसांनी पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे अशा चौघांना ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सोमवारी सकाळी ( 9 डिसेंबर) सतीश वाघ हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. मात्र हडपसर भागातील शेवाळेवाडी चौकातून चार ते पाच लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. त्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यानंतर सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली, पोलिसांनी कसून तपास सुरू केला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास शिंदवणे घाटात त्यांचा एका निर्जन ठिकाणी त्यांचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकाचं अशाप्रकारे अपहरण होत असेल तर मग सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्नही उपस्थित झाला. पोलिसांनी तपासादरम्यान एकाच दिवसांत तब्बल 450 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर या तपासात पोलिसांना मोठं यश आलं. त्यांनी अथक तपास करत गुन्हेगारांना अटक केली. त्यानतंर तपासात धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपी अक्षय जावळकर मुख्य सूत्रधार आहे. तो वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून रहात होता. मात्र काही दिवसांपूर्वी काही कारणावरून त्याचा वाघ यांच्याशी वाद झाल्याने जावळकरने त्यांचा खून करण्याचा कट रचला होता. या खुनातील आरोपी अक्षय जावळकर आणि पवन शर्मा हे दोघे एकाच ठिकाण काम करयाचे. त्याच्या साथीनेच जावळकरने खुनाचा कट रचत आरोपींना पाच लाखांची सुपारी दिली. कटानुसार, सोमवारी सकाळी वाघ यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी धावत्या मोटारीत त्यांचा खून केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने तब्बल 72 वार करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह निर्जन जागी फेकून देण्यात आला. चारही आरोपींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.