
चक्क या अभिनेत्रीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा
सरकारच्या महिलांसाठीच्या योजनेत भोंगळ कारभार, पतीचे नाव बघून बसेल धक्का?
रायपूर – महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेचा महायुती सरकारला निवडणूकीत मोठा फायदा झाला. त्यामुळे प्रत्येक राज्यात महिला वर्गाला खुश करण्यासाठी विविध नावाच्या योजना सुरु आहेत. छत्तीसगड राज्यातही ‘महतरी वंदन योजना’ सुरू आहे. पण या राज्यातील या योजनेचा लाभ चक्क एका अभिनेत्रीलाही मिळत असल्याचे समोर आले आहे.
छत्तीसगड सरकारच्या ‘महतरी वंदन योजना’चे लाभ बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला मिळत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या योजनेची ‘ती’ लाभार्थी असून तिला दर महिना पैसे पाठवण्यात आल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. महतरी योजनेच्या वेबसाईडवर तपासणी दरम्यान फाईलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओन आणि पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आले आहे. बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमध्ये हा प्रकार घडला आहे. भोंगळ कारभाराचा कहर म्हणजे लाभार्थ्याला मार्च आणि डिसेंबरचा हप्ता मिळाल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाला माहिती मिळताच जिल्हाधिकारी बस्तर यांनी तहसीलदार आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तलूर गावात पाठवले. जिथे तपासात सर्व काही स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्या ओळखपत्रावर ही नोंदणी करण्यात आली असून गावातील वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने त्यांच्या खात्यातून फसवणूक करून बेकायदेशीरपणे रक्कम काढली. सरकारची फसवणूक करताना आरोपी महतरी वंदन योजनेचा लाभ घेत होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर लोकांचीही नावे पुढे येतील, असे जिल्हाधिकारी बस्तर यांनी सांगितले आहे.
महिलांना ‘महतरी वंदन’ या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिना १००० रुपये पाठवले जात होते. या योजनेची घोषणा सत्ताधारी भाजपने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीरनाम्यात केली होती. पहिला हप्ता १० मार्च रोजी मोदींच्या हस्ते जारी करण्यात आला होता. सध्या ७० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.