
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींची हत्या
हत्या प्रकरणातील नव्या दाव्याने खळबळ, मुख्य आरोपी फरार, हत्याकांडाने नवीन चर्चा?
बीड – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २० दिवस उलटले, पण अजूनही अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील पोलिसांनी पकडले नसलेल्या तीन आरोपींबाबत मोठा दावा केला आहे. या प्रकरणात पकडले जात नसलेल्या ३ आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला आहे. याबाबत मला फोन आल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती आपण पोलिसांना दिल्याचे दमानिया यांनी सांगितले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, “काल रात्री १२ वाजताच्या दरम्यान मला एक फोन आला. त्यांनी मला व्हॉट्स अॅपवर कॉल घेण्यास सांगितले. मी व्हॉट्स अॅपवर कॉल केला तर तो झाला नाही. त्यांनी मला व्हाईस मेसेज पाठवले. यात त्यांनी सरपंच हत्या प्रकरणातील तीन आरोपी मिळणारच नाहीत, कारण त्यांचे मर्डर झाले आहेत. याची माहिती मी एसपींकडे दिली आहे, असंही दमानिया म्हणाल्या आहेत. दमानिया यांनी धनंजय मुंडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपींना तातडीने अटक करावी आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवणचक्कीचे काम पाहणाऱ्या अधिकाऱ्याला दोन कोटी रूपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडची पत्नी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीने चाैकशी केली आहे. त्यामुळे यात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.