
दुसऱ्या तरुणासोबत फिरल्यामुळे पतीने केला पत्नीचा खून
कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, पत्नीच्या मागण्यांमुळे पतीचे टोकाचे पाऊल
मुंबई – मुंबईतील मालाड परिसरात पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . लग्न होऊनही पत्नी दुसऱ्या तरुणसोबत फिरण्याबरोबरच ती पतीकडून अधिक पैशांची मागणी करत असल्याचा राग मनात धरुन पतीने पत्नीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
नितीन धोंडीराम जांभळे असे अटक आरोपीचे नाव असून तो मालाड पूर्व येथील कासमबाग परिसरातील रहिवासी आहे. कोमल असे मृत महिलेचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. मृत महिला व आरोपी नितीन यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. पण कुटुंबियांना लग्न मान्य नसल्यामुळे ते वेगळे राहत होते. कौटुंबिक नाराजी आणि पैशांवरून त्यांच्यात सतत वाद होत होते. लग्नानंतर कोमल बाहेरगावी जायची. ती दुसऱ्या एका तरुणसोबत फिरू लागली. त्यांचा एक खासगी फोटो पती नितीनने व्हायरल केला होता. याबद्दल कोमलने पतीविरुद्ध गुन्हाही नोंदवला होता. तसेच नितीन हा अनेकदा आपल्या पत्नीला आपल्यासोबत राहण्यासाठी बोलवत असेल. मात्र ती त्याच्याकडे अधिक पैशांची मागणी करत होती. त्यामुळे तो संतप्त झाला होता. घटनेच्या दिवशी आरोपी नितीनने पीडित कोमलला त्याच्या कासमबाग येथील रामजी जोरगे चाळीतील घरी बोलावले. तेथे झालेल्या वादातून आरोपीने कोमच्या मानेवर, पाठीवर व गळ्यावर चाकूने वार केले. तिला तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर येथे नेण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर नितीन स्वतः पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे.
कोमलच्या आईला आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केल्यानतंर ही बाब समजली. कोमलच्या आईच्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.