
संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग नाही?
सात आरोपींवर मोक्काची कारवाई, वाल्मिक कराड का सुटला?जाणून घ्या संपूर्ण माहिती
बीड – बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. मात्र अद्याप याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पण आता याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. .
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र, हत्येमध्ये मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडवर मात्र मोक्का लागलेला नाही. खून प्रकरणातील संशयित सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. मोक्काच्या कलम ३ (१) नुसार आरोपींना किमान ५ वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग दिसला तर त्याच्यावरही अशीच कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोक्का हा कठोर कायदा समजला जातो. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा मोक्का लागला, की त्याला सहज जामीन मिळत नाही. आरोपींना तुरुंगातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो. त्यामुळे एसआयटीने केलेली मोक्काची कारवाई महत्त्वाची समजली जात आहे.