आमदार सुरेश धसांचा पीए असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून उकळले पैसे
बोगस पीएला मराठा आंदोलकांनी दिला भरचाैकात चोप, गेडाम यांच्याही नावाचा वापर, व्हिडीओ व्हायरल
धाराशिव – सुरेश धस यांचा पीए असल्याचे सांगत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. त्यानंतर या ठगाला मराठा आंदोलकांनी चांगलाच चोप देत पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आशिष विसाळ असं या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. जनआक्रोश मोर्चाच्या नावानं तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची आहे, असं सांगून हा व्यक्ती अधिकाऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी एका अधिका-याकडून पैसे मागत असताना आंदोलक तिथे पोहोचले. यानंतर त्यांनी ज्याला जाब विचारला. त्यानंतर तो चांगलात गडबडला. यानंतर मराठा आंदोलक त्याला चोप देत आनंदनगर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांना फोन लावला. विसाळच्या या कृत्याची माहिती मिळताच आमदार धस संतापले. त्याला सोडायचं नाही, त्याच्या फोन आणि बँक डिटेल्सची चौकशी करा, असं पोलिसांना सांगितले. तसेच त्याला ६ फेब्रुवारीला आष्टीला घेऊन या, मी त्याला कसा तुडवतो ते पहा! अशी जाहीर धमकी ही त्यांनी दिली आहे. दरम्यान आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विशाळने माजी जिल्हाधिकारी प्रवीण गोडाम यांचे नाव आणि फोटो देखील डीपीला ठेवला होता. तसेच आपण गेडाम यांचे खास मित्र असल्याचा दावा करत अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले होते. प्रवीण गेडाम यांनी याबाबत पोलिसात तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.